सोलापूर हादरले! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोने घेऊन तिघे फरार

Foto
सोलापूर : एकीकडे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असतानाच, शहरात एका खळबळजनक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी करणार्‍या अय्युब हुसेन सय्यद (वय ५०) या लोकप्रिय तृतीयपंथी उमेदवाराची त्यांच्याच घरात उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या अंगावरील लाखो रुपयांचे दागिने ओरबाडून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अय्युब सय्यद हे सोलापूर पालिकेच्या प्रभाग १६ मधून नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले होते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेले अय्युब आपल्या व्हिडिओंच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत होते. त्यांच्या पोस्टला लाखांच्या घरात व्ह्यूज मिळत असल्याने त्यांची चर्चा संपूर्ण शहरात होती. १५ जानेवारीला मतदान होणार होते, परंतु त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अय्युब यांच्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर होते. रात्री ११:३० च्या सुमारास तीन संशयित इसम त्यांच्या घरात शिरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. याच तिघांनी रात्रीच्या सुमारास अय्युब यांचा उशीने तोंड दाबून जीव घेतला. क्रूरतेचा कळस म्हणजे, आरोपींनी अयुब यांच्या अंगावरील सुमारे ४० ते ५० तोळे सोने लंपास केले असून, कानातील दागिने काढताना त्यांचे कानही फाडण्यात आले आहेत.

असा उघड झाला प्रकार

शनिवारी दुपारपर्यंत अय्युब खाली न आल्याने त्यांच्याकडे राहणार्‍या एका महिलेला संशय आला. तिने वर जाऊन पाहिले असता अय्युब बेडवर मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच लष्कर परिसर आणि सदर बझार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातून काही चिठ्ठ्याही जप्त करण्यात आल्या असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

सीसीटीव्हीत खुनी कैद

पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे २ च्या सुमारास तीन व्यक्ती अय्युब यांच्याच दुचाकीवरून पसार होताना दिसत आहेत. अय्युब यांच्या अंगावर नेहमी लाखो रुपयांचे सोने असायचे. त्यामुळे ही हत्या केवळ लुटीच्या उद्देशाने झाली की यामागे निवडणुकीचे काही राजकीय वैमनस्य आहे, या दोन्ही बाजूने पोलीस तपास करत आहेत.
या घटनेमुळे सोलापूरमधील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून, लष्कर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.